नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सध्या गाजत असलेल्या बॉलिवूडमधील ड्र्ग्स रॅकेटचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत जया बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ड्रग्सवरून बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.


संजय राऊत म्हणाले की, जया बच्चन यांनी केलेले विधान अगदी योग्य आहे. कंगना राणौत हिने जे विधान केले आहे त्यावर बच्चन कुटुंबीय प्रतिक्रिया देऊ शकते. कंगना राणौत आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप करत आहे त्याचे पुरावे तिने गृहमंत्रालय, गृहसचिव आणि तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. या प्रकरणावरून जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांचीच पहिल्यांना डोप टेस्ट झाली पाहिजे.
जर आंतरराष्ट्रीय मार्गांनी ड्रग्स येत असेल तर ती केंद्र आणि केंद्रीय तपास यंत्रणांची जबाबदारी आहे. कुठल्याही क्षेत्रात काही वाईट लोक आहेत. याचा अर्थ ते संपूर्ण क्षेत्र वाईट आहे, असा होत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या विधानाला प्रियांका चतुर्वेदी यांनीही पाठिंबा दिला आहे. जया बच्चन या बरोबर बोलल्या. त्यांनी चित्रपट सृष्टीत काम केलेले आहे. त्यामुळे त्या या क्षेत्राच्या समर्थनासाठी पुढे आल्या आहेत. चित्रपटसृष्टी देशाची शक्ती आहे, त्यामुळे तिला बदनाम करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.







