गुढे.ता.भडगांव(वार्ताहर) – यावर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विहीरींच्या पाण्यावर ठिंबक सिंचनावर व काही शेतकऱ्यांनी सरी पध्दतीने खरिपपूर्व कपाशी लागवड केली होती ती कपाशी आता भाद्रपदाच्या उन्हाच्या तडाख्यात फुटू लागल्याने कपाशीची पहिली तुरळक वेचणी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.या निमित्ताने कपाशीचा परिसरात वेचणीचा श्रीगणेशा झाला आहे.


मागील वर्षी परिसरात समाधानकारक झालेला पावसाळा तसेच गिरणा नदीला व जामदा डावा उजवा कालव्यास रब्बीला सोडलेल्या पाणी आर्वतनामुळे गिरणा पटयात विहीरींच्या जलपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची झळ,टंचाई जाणवली नाही म्हणून परिसरात गिरणा पटयात यावर्षी मोठ्या प्रमाणात मे महिन्यात ठिंबक सिंचनावर व काही शेतकऱ्यांनी सरी पध्दतीवर मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली होती या लागवडीनंतर जून महिन्यात मृग नक्षत्रात सुरुवातीलाच पाऊस आल्याने पहिल्या आठवडा भरातच पावसाच्या पाण्यावर कपाशी लागवड झाली म्हणून आधीच्या लागवड झालेल्या कपाशीला मोठा फायदा झाला.मृग नक्षत्रानंतर मात्र लहरी पाऊस येत जात राहिल्याने यावर कपाशी पिक वाढत जाऊन आता मे महिन्यातील लागवड झालेल्या कपाशीची पहिली तुरडक वेचणीला प्रारंभ झाला आहे.सुरुवातीची फुटलेली कैरी काळी पडल्याने काही प्रमाणात कापूस खराब व कवडीचा निघत आहे.म्हणून शेतकऱ्यांना कापूस हंगामाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.







