नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा कोणासोबतही आघाडी करणार नसून बीएसपीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार असल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे.

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मायावती यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. तसेच देशात सुरू होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचेही मायावतींनी स्वागत केले आहे. सर्व नागरिकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मायावतींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली.
मायावतींचा आज 65 वा वाढदिवस आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब, असहाय्य आणि कोरोना रुग्णांना मदत करण्याचा आग्रह मायावतींनी आपल्या कार्यकर्त्यांकडे केला आहे. ’15 जानेवारी 2021 रोजी माझा 65 वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करताना साध्या पद्धतीनं तसंच पीडित, गरीब आणि असहाय्य लोकांना आपापल्या सामर्थ्यानुसार मदत करत ‘जनकल्याणकारी दिवस’ म्हणून हा दिवस साजरा करावा’ असे आवाहन मायावतींनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.







