राष्ट्रीय खेळाडू इकबाल मिर्झा यांची
केसरीराज कार्यालयास भेट
जळगाव (प्रतिनिधी) – सध्या विविध खेळामध्ये मुला व मुलींची क्रेझ वाढली आहे. तसेच शासनाच्या धोरणानुसार शिक्षणासह आता खेळामध्येही विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळत आहे. पालकांनी मुलांवर जास्त दडपण न आणता त्यांच्या आवडीनुसार खेळाकडे वळू द्यायला पाहिजे असे जिल्हा क्रीडा महासंघाचे सल्लागार व राष्ट्रीय खेळाडू इकबाल मिर्झा यांनी जळगाव येथील गोलाणी मार्केटमधील केसरीराज कार्यालयास भेटप्रसंगी मत व्यक्त केले.
यावेळी केसरीराजचे संपादक भगवान सोनार व कार्यकारी संपादक नरेश बागडे उपस्थित होते. चर्चेत श्री.मिर्झा पुढे म्हणाले की, मी वयाच्या 10 ते 12 वर्षापासून खेळाकडे वळलो होतो. त्यात हॉकी व फुटबॉल तसेच अॅथलेटिक्स 100 मिटरमध्ये अग्रेसर राहिलो.आता मात्र वयाच्या 50 वर्षातही खेळाडूंना प्रशिक्षण तसेच पोलीस, एस.टी.किंवा कोणत्याही शासकीय व निमशासकीय यांच्या माध्यमातून होणार्या क्रीडा स्पर्धेत मुख्यपंच म्हणून काम पाहत आहे.
मिर्झा सरांना कोरोनाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या जगभरात कोरोना या महामामारीने थैमान घातले आहे. त्यात लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील खेळाडू घरी बसून आहे. त्यामुळे खेळाडूंचा शारिरिक व मानसिक तणाव वाढलेला आहे. सध्या शैक्षणिक संस्था बंद, खेळबंद असल्याने खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे की नाही? याची चिंता जाणवू लागली आहे. खेळाचे 40 पेक्षा जास्त विविध प्रकार आहे.
त्यात शासनाच्या धोरणानुसार जिल्हास्तरीय खेळाडू जर खेळला तर त्याला 5 टक्के, राज्यस्तरीय-10 टक्के व अंतरराष्ट्रीयसाठी 25 टक्के असे क्रीडा गुण मिळतात.ज्या खेळाडूंनी आपला भविष्य क्रीडा क्षेत्रात घडवायचा ठरविले असेल तर त्याचे तर कोरोनामुळे खेळाचे भविष्यच उध्वस्त होण्याची शक्यता आहे.कारण घरी बसून तरी करायचं काय? कितीवेळ घरी बसायचं शरीराला कोणत्याच हालचाल नाही. त्यामुळे सध्या कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवण्यावर मोठे संकट उभे राहिले असल्याचेही राष्ट्रीय खेळाडू इकबाल मिर्झा यांनी केसरीराज कार्यालयात भेटप्रसंगी संवाद साधतांना सांगितले.