नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- दिल्ली दंगल प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोप पत्र दाखल करून त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि अन्य लोकांना त्यात आरोपी केले आहे. त्या प्रकरणावरून कॉंग्रेसने आज भाजपला जोरदार धारेवर धरले. हा प्रकार म्हणजे क्रिमीनल जस्टीस सिस्टीची थट्टा करण्याचा प्रकार आहे असे पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
या संबंधात चिदंबरम यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी भाजपने अत्यंत नीच पातळी गाठली आहे. त्यांनी म्हटले आहे की दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी गुलफिसा फतिमा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात येचुरी व अन्य विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावे घेतली आहेत. त्या सर्वांना दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात आरोपी केले आहे. म्हणजे आरोपी ज्यांची कोणाची नावे घेईल त्या सर्वांना अशा प्रकरणांत आरोपी केले जाणार आहे काय असा सवालही चिदंबरम यांनी विचारला आहे.
माहिती आणि आरोपपत्र या दरम्यान तपास आणि पुरावा गोळा करणे याचीही प्रक्रिया असते ती प्रक्रिया मात्र दिल्ली पोलिस विसरली आहे असा टोमणाही त्यांनी मारला आहे. येचुरी यांच्या समवेतच स्वराज अभियानाचे योगेंद्र यादव, अर्थ तज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपुर्वानंद यांचीही या आरोपपत्रात नावे आहेत.