गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या पथराड येथील आदर्श उपक्रमशील जि.प.शाळेने कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची मोठी अडचण,गैरसोय,लक्षात घेता पथराड येथील शिक्षकांनी घरपोच शिक्षण हा नावीन्यपूर्ण विद्यार्थी हिताचा उपक्रम सुरू केला आहे
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु ग्रामीण भागातील अँड्रॉईड मोबाईल ,नेटवर्कची मर्यादा लक्षात घेता १० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचणे शक्य नव्हते. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देणे सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासमालिका घरपोच देऊन त्या सोडवून जमा करायच्या व परत दुसरी अभ्यासमालिका द्यायची. यासाठी गेल्या वर्षी लोकसहभागातून शाळेने घेतलेला काँम्पुटर प्रिंटर कामी आला. अभ्यास संचाच्या प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहच करायच्या आणि सोडवून घ्यायच्या. काही अडचण असल्यास पालक किंवा विद्यार्थी शिक्षकांशी संपर्क करतात शिक्षक योग्य ते मार्गदर्शन करतात. यासाठी मुख्याध्यापक सुकदेव माळी शिक्षक दीपक भालेराव,प्रवीण पाटील, नंदू पाटील हे विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेत आहेत.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाला गावातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य व पालकांचे , शिक्षण प्रेमी मंडळींचे शाळा व्यवस्थापन समिती चे सहकार्य लाभत आहे.या घरपोच शिक्षणामुळे पालकांनी समाधान व्यक्त करुन शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.