वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे आराध्य दैवत आहे. काही उद्योजक संताजी यांच्या नावाचा गैरवापर करतात. जालना येथील उबाळे कंपनीने एका बिडी बंडलवर संताजी असे छापून महाराजांचा अपमान केल्याने, तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन संताजी जगनाडे महाराज समस्त तेली समाजातर्फे नायब तहसीलदार पोळ यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, उबाळे कंपनीविरुध्द समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, या कंपनीच्या मालाकाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. या कंपनीविरुध्द शासनाने कायदेशीर कारवाई करावी. काही लोक संतांच्या, महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करतात. बिडी बंडलवर नाव, तंबाखू उत्पादनावर दारु दुकाने, बियर शॉपी, बिअरबार, मटन हॉटेल यांचेवर महापुरुषांची संतांची नावे नावे टाकून आपला उद्योग व्यवसाय चालवतात. या सर्वांमुळे जनभावना दुखावते.
समाजभावना दुखावेल अशा कोणत्याही संताचे, महापुरुषाचे नाव अशा व्यवसायावर असू नये, यापुढे संतांच्या व महापुरुषांच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार पोळ यांना देतेवेळी चोपडा तेली समाजाचे अध्यक्ष के.डी.चौधरी, सचिव बी.के.चौधरी, सहसचिव प्रशांत सुभाष चौधरी, तसेच समाजाचे कार्यकर्ते नारायण चौधरी, छोटू चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र चौधरी, लक्ष्मण चौधरी, शरद चौधरी, सूर्यकांत चौधरी उपस्थित होते.