मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपच्या गोटात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर शपथविधी उरकला होता. नंतर राष्ट्रवादीने सारवासारव करीत शिवसेना व काॅंग्रेससह सरकार स्थापन केलं. मात्र आजही अजित पवारांनी त्यावेळी केलेल्या कृतीची चर्च होत असते. शपथविधीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वीच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यावेळी कुणाल कामराने संजय राऊत यांना गेल्यावर्षी महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्याविषयी प्रश्न विचारले.
अजित पवार यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का? अशी विचारणा कुणाल कामरा याने केली. ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. या प्रश्नावर राऊत यांनी सूचक मौन बाळगले. अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.








