जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपहारगृहात (कॅन्टीन) अनेक नातेवाईकांना भोजन किंवा नाश्ता मिळत नसल्याची ओरड होत आहे. अनेकदा तर रुग्णालयात दाखल रुग्णांना सुद्धा भोजन मिळत नाही. ठरलेल्या वेळेशिवायदेखील जर रुग्ण दाखल झाला असेल व त्याला भोजनाची गरज असेल तर त्याला भोजन मिळाले पाहिजे, अशी मागणी नातेवाईकांची आहे. त्यामुळे उपहारगृहाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना नाश्ता, भोजन मिळावे याकरिता उपहारगृह आहे. या उपहारगृहातून दररोज नाश्ता, भोजन रुग्णांना देण्यासाठी तेथील कर्मचारी जात असतात. मात्र रुग्णालयात दिवसभर रुग्ण विविध कक्षात दाखल होत असतात. त्यांच्या वेळा जेवण देण्याच्या वेळांशी जुळत नाहीत. अशा रुग्णांना मात्र जेवणाची गरज असली तर त्यांना गेटबाहेरून विकत आणावे लागते. उपहारगृहातून त्यांना जेवण मिळत नाही.
तसेच, रुग्णांच्या सोबत कमीत कमी १ ते २ नातेवाईक दररोज असतात. त्यांनाहि जेवणाची आवश्यकता असते. अशाना उपहारगृहातून शिवभोजन दिले जाते. जे भोजन घेण्यापासून वंचित राहतात, त्यांना मात्र मिळत नाही. तसेच, उपहारगृहातील भोजनाचा दर्जा अनेकदा खालावलेला दिसून आला अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना इतर खाद्यपदार्थ हवे असतील तर ते विशिष्ट रक्कम देऊन मिळते. मात्र, उपहारगृहात विशिष्टच मेनू असतो. भोजनासाठी मेनूचे पर्याय कमी असल्याने अनेकजण तसेच परत जातात.
त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनादेखील जेवण मिळाले पाहिजे अशी मागणी होत आहे. तसेच, जेवणाचा दर्जा देखील वाढला पाहिजे. दिवसभरात रुग्ण ज्या वेळी कक्षात ऍडमिट झाला तर त्याला भोजन मिळाले पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांनी केली आहे. सध्या नाश्ता सकाळी ८ वाजता, भोजन दुपारी १२ तर रात्री ७ वाजता दिले जात आहे. या वेळांशिवाय भोजन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.