अमळनेर (प्रतिनिधी) – सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीस आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्रक अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिले आहे. आम आदमी पार्टीचा जुन्या पेन्शन योजने संदर्भातील सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते. आणि सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.
२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे निवृत्तीपश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या त्या समयीच्या बाजारस्थितीनुरूप असेल. अर्थात शेअर बाजारातील सरकारी गुंतवणुकीची कशी वाट लागते याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला आहे. या इतर अनेक कारणांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलन करतायत. आम आदमी पार्टीचा सरकारी कर्मचा-यांच्या या मागणीला पूर्ण पाठींबा आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.