पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समितीतील ग्रामसेवक, तलाठी या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या रास्त मागणीसाठी आज १४ मार्च पासुन संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी समन्वय समिती बैठकीत पुकारलेल्या नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात पाचोरा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद दि. १४ मार्च २०२३ पासुन बेमुदत संपात सहभागी झाले असुन मागण्यांचा योग्य विचार होवुन “समान काम, समान न्याय” या नुसार मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात. अशा आषयाचे निवेदन तालुक्यातील सर्व प्राथमिक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, आरोग्य संघटना, महसूल विभागातील कर्मचारी संघटना, पंचायत समिती विभागातील ग्रामसेवक, तलाठी, चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटना यासह विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारण्यात येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी बी. एस. भालेराव, गट शिक्षणाधिकारी गिरीष जगताप यांना देण्यात आले आहे.
या संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी निवेदन देण्यापुर्वी शहरातील हुतात्मा स्मारकात एकत्रित येवुन तेथुन उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत “एकच मिशन, जुनी पेन्शन”, “कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.