नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील मदारपुर गावाजवळ रविवारी सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातून वाचलेली चारही लहान मुलं आहेत. मात्र, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस आधार कार्ड आणि फोन नंबरच्या माध्यमातून अपघातातील नागरिकांची ओळख पटवण्याचं काम करत आहेत.
कर्नुलच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले, की घटनेच्या वेळी वाहनात 18 लोक होते. ही घटना कर्नुलपासून जवळपास 25 किलेमीटरच्या अंतरावर मदापुरमच्या वेलदुर्ती मंडळात रविवारी पहाटे 4 वाजता घडली. या दुर्घटनेत वाहन चालकाचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधील 18 लोक चित्तूर जिल्ह्यातील मदनापल्ले इथून राजस्थानच्या अजमेरकडे निघाले होते. इतक्यातच भरधाव वेगात असलेली ही बस रोडवरील डिवायडरला धडकली आणि यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकला टक्कर दिली. हा अपघात इतका भयानक होता, की बसमधील मृतदेह बाहेर काढणंही शक्य होत नव्हतं. शेवटी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला.
या घटनेनं दोन दिवसांपूर्वी विशाखापट्टनम जिल्ह्यातील अराकुच्या जवळ अनंतगिरीमध्ये झालेल्या भीषण घटनेची आठवण ताजी करून दिली. या घटनेत बस खोल खड्ड्यामध्ये कोसळली होती. यात 30 लोक प्रवास करत होते. यातील 8 लोकांचा मृत्यू झाला होता.