जळगाव (प्रतिनिधी)- कुसूंबा येथे मित्राच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतणार्या दोन तरुणांच्या गटात पूर्व वैमन्यसातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सुप्रिम कॉलनी परिसरात घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून चॉपर, लोखंडी पाईप व लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने विशाल राजू अहिरे (28, रा. रामेश्वर कॉलनी), किरण खर्चे (रा. सुप्रिम कॉलनी) व किरण गव्हाणे हे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी किरण शिवाजी गव्हाणे रा. रामेश्वर कॉलनी, आकाश दिलीप परदेशी रा. सुप्रिम कॉलनी, दिपक लक्ष्मण तरटे रा. रामेश्वर कॉलनी यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.
दोन्ही गट समोरासमोर भिडले
याबाबत जखमींकडून मिळालेली माहिती अशी की, कुसूंबा येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने दोन्ही गट कुसूंबा येथे अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून दोन्ही गट कुसूंबा टोल नाक्याजवळ आले असता. याठिकाणी जून्या वादातून दोन्ही गट समोरासमोर भिडत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून चॉपरसह लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात असून यामध्ये विशाल राजू अहिरे (28, रा. रामेश्वर कॉलनी), किरण खर्चे (रा. सुप्रिम कॉलनी) व किरण गव्हाणे हे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सोन्याची चैन हिसकवून चॉपरने भोसकले
जखमी विशाल अहिरे यानी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल हा किरण गव्हाणे, आशू मोरे, विशाल पाटील, दिपक तरटे यांच्यासोबत कुसूंबा येथे अंत्यसंस्कारासाठी गेला होता. अंत्यसंस्कार आटोपून तो (एम एच 19 डीपी 0023) क्रमांकाच्या मोटारसायकलने घराकडे जात होता. याचवेळी मागून स्विफट कारमध्ये आलेल्या किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याह दोन जांनी विशालला थांबवित आम्हाला खून्नस देतो असे म्हणत चॉपरने विशालवर वार केले. यावेळी त्याच्या सोबत असलेल्यांनी देखील दगड व लोखंडी रॉडच्या सहाय्याने विशाल व किरण गव्हाणे यांना बेदम मारहाण केली. मारहणी दम्यान, किरण खर्चे याने विशालच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याची चैन लंपास केली असून किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण यांच्यासह दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी आडवी लावून चॉपर हल्ला
जखमी किरण खर्चे याने दिलेल्या जबाबानुसार, किरण खर्चे हा मित्र किरण चितळे याच्यासोबत कुसूंबा येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणाहून दुचाकीने परतत असतांना कुसूंबा टोल नाक्याजवळ मागून दुचाकीवर येवून विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दिपक तरटे, राकेश सपकाळे, सर्व रा. जळगाव यांच्यासह दोन अशा एकूण सात जणांनी किरणच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावली. तसेच शिवीगाळ धमकी देत, लोखंडी चॉपर, लोखंडी पाईपने तसेच दगडाने मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी काही नागरिक आले असता, त्यांनाही चाकूने मारण्याची दशहत दाखवून तसेच आरडाओरड करुन पिटाळून लावले. यानंतर काही वेळाने सर्व जण पसार झाले. मारहाणीत जखमी किरण खर्चे यास त्याचा मित्र किरण चितळे याने रिक्षातून रुग्णालयात हलविले. त्यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
सहा जणांना पोलिसांकडून अटक
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांनी भेट दिली व आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे संदीप हजारे निरीक्षक उपनिरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार अतुल बंजारी रामकृष्ण पाटील सचिन मुंडे, इमरान सैय्यद, गोविंदा पाटील,राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, सतीश गरजे, सचिन पाटील, सिद्धेश्वर डापकर, अशांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली आहे इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दोन सराईत गुन्हेगाराचा रुग्णालयातही वाद
किरण खर्चे हा हिस्ट्रीसिटर असून त्याचेवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यास पूर्वी एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले होते तसेच प्रशांत आहिरे याचे वर यापूर्वी खुनाचा प्रयत्न व गैरफायदा गावठी बंदूक वापरण्याबाबत चा गुन्हा दाखल होता त्याला दोन वर्षाची शिक्षा लागलेली असून त्याने 19 महिन्याची शिक्षा भोगलेली आहे. तो मार्च महिन्यापासून जामीनावर आहे. या दोघांवर भंगाळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल असताना तेथे सुद्धा त्यांचा वाद झाला होता