जामनेर (प्रतिनिधी) – दुचाकी जाळण्याचे लोण आता जळगाव शहरानंतर जामनेर शहरातही आले आहे. शनिवारी रात्री एकाच व्यक्तीच्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी पेटवल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करीत आहेत.
जामनेर शहरातील शास्त्रीनगर भागात संतोष दिनकर थटार हे राहतात. शनिवारी दि. १२ नोव्हेंबर रात्री ३ वाजेच्या सुमारास संतोष दिनकर थटार यांच्या मालकीच्या दोन मोटरसायकल अज्ञात समाजकंटकाने डिझेल व कपडे टाकुन पेटवून दिल्याची घटना घडली आहे. सदरील घटना ही रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली.
यात एमएच१९ बीई ४२८७ या नंबर ची होन्डा शाईन गाडी पूर्णपणे खाक झाली तर दुसरे वाहनही पेटणार तोच शेजारी असलेल्या रत्नाबाई जैन यांना जाग आली असता त्या समाजकंटकाने पळ काढला. एम एच १४ एचआर १८४४नंबरची फॅशन प्रो वाहनाचे आगीची आस लागून नुकसान झाले आहे. तरी संतोष थटार यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिस पुढील तपास करीत आहे.