मुंबई( वृत्तसंस्था) – राजनीतीक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर भाजपचे अतुल भातखळकर यांनी खोचक ट्विट करून पवारांवर टीका केली आहे.
2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील., असं खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवार-प्रशांत किशोर भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केलाय.
दरम्यान, पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर राष्ट्रवादीने खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.