नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा अखिलेश यादव यांचं सरकार होतं तेव्हा मला उत्तर प्रदेशमध्ये येण्यापासून 12 वेळेस रोखण्यात आलं होतं व 28 वेळा मला येण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली होती, आता आलो आहे” असं म्हणत ओवैसी यांनी टोला लगावला आहे. तसेच सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्यासोबत युती केली आहे. मी मैत्री निभवण्यासाठी आलो आहे. आम्ही दोघं यूपीमध्ये टक्कर देऊ असं देखील ओवैसींनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसी वाराणसी विमानतळावर पोहचताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. तर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ओवैसी यांनी जेव्हा आम्ही कोणतीही निवडणूक लढवतो तेव्हा ती जिंकणं हाच आमचा उद्देश असतो असं देखील म्हटलं आहे. ओवैसा आणि राजभर आझमगड आणि मऊ येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट देखील घेणार आहेत. आगामी निवडणुकांसाठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
“मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच” असं याआधी ओवैसी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भारतीय ट्रायबल पार्टी आणि प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोबत आले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीटीपी आमदार छोटूभाई वसावा यांनी माहिती दिली. वसावा म्हणाले, बीटीपी आणि एआयएमाआयएम संविधान वाचविण्यासाठी एकत्रितपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.
छोटू वसावा हे जहागडियाचे आमदार आहेत. ते म्हणाले, बीटीपी आणि AIMIM गुजरातमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. तसेच चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही हटविण्यासाठी जनतेला काम करावे लागेल. बीटीपीला राजस्थानमध्ये धोका मिळाला कारण तेथे बीटीपीला दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले होते, असेही ते म्हणाले.
असदुद्दीन ओवेसी यांनी राजस्थानत बीटीपीला पाठिंबा देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाच, ओवेसी राजस्थानातील राजकारणात उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचा कयास लावला जात होता. ओवेसी यांनी एका ट्विटच्या माध्यमाने बीटीपीला समर्थन दर्शवले होते. बीटीपीने नुकतेच अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे.







