अमळनेरचे तहसीलदार निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली


निलंबनाच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन
अमळनेर : गौण खनिज चोरी व अवैध वाहतुकीच्या प्रकरणात निष्क्रियता आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर १२ ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी त्यांच्या समर्थनार्थ एकवटले असून, निलंबनाचा निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा करत तो मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे. सुराणा यांच्यावर गौण खनिज चोरी व अवैध वाहतूक रोखण्यात निष्क्रिय राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला असला, तरी गेल्या सहा महिन्यांत त्यांनी तापी व गिरणा नदीपात्रासह विविध ठिकाणी केलेल्या कारवायांचा संघटनेने दाखला दिला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर वाहने जप्त करण्यात आली असून, लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक रोखण्याची जबाबदारी केवळ तहसीलदारांची नसून महसूल विभागासोबत पोलीस, आरटीओ, स्थानिक प्राधिकरण आणि ग्राम दक्षता समिती यांचीही संयुक्त जबाबदारी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने शारीरिक हल्ले, मानसिक त्रास आणि धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अनेकदा कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपेक्षित संरक्षण मिळत नाही, तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
सुराणा यांच्यावरील निलंबनाची कारवाई एकतर्फी, अवाजवी आणि अन्यायकारक असल्याचा दावा करत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य ती सुनावणीची संधी द्यावी, निलंबनाचा आदेश मागे घ्यावा आणि त्यांची अमळनेर येथे पूर्ववत नियुक्ती करावी, अशी मागणी महसूल अधिकारी संघटनेने केली आहे.
या निवेदनावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे, विजयकुमार ढगे, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, बोदवड तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश बखारे, जामनेर तहसीलदार एन. एस. आगळे, एरंडोल तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








