मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर कंगनाला थेट झाशीची राणी सुद्धा म्हणत नेटकऱ्यांनी समर्थन दिले होते तर आता पालिकेच्या या कारवाईवर दाक्षिणात्य अभिनेता विशाल याने नाराजी व्यक्त केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने कंगनाची तुलना थेट क्रांतिकारक भगत सिंग यांच्याशी करत तिला पाठिंबा दिला आहे.

याच मुद्यावरून प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मीम शेअर केलंय ज्यावर लिहिलंय की, कंगना जर सिनेमा करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर या हिशेबाने दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झालेत. प्रकाश राज यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण जास्तीत जास्त लोक वेगवेगळ्या कलाकारांच्या भूमिका आठवून गंमत करत आहेत. याआधी प्रकाश राज यांनी कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिल्यावरही तिखट प्रतिक्रिया दिली होती.







