जळगाव (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील सर्व कोविड रूग्णालय आणि कोविड आरोग्य केंद्रातील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरीय समित्या नेमण्याचे आदेश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी उशिरा काढले आहेत.यानुसार आता जिल्ह्यात देखील ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा होण्यासाठी प्रशासन कामाला लागली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.
राज्यात कोविड रूग्णालयामध्ये ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.राज्यात पुरेशे ऑक्सिजनचे उत्पादन होवून सुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता शासनाने वर्तविली आहे.शासनाच्या परिपत्रकामध्ये यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.त्यामध्ये जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी सर्व कोविड रूग्णालयामध्ये प्रतिदिन लागणार्या ऑक्सिजनची माहीती रूग्णालयानुसार संकलित करावी व ती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावी असे म्हटले आहे.तसेच ऑक्सिजन पुरवठा संनियत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उद्योग विभागाचे अधिकारी, परीवहन अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यजिल्हाशल्यचिकत्सक यांची समिती नेमावी. या समितीने दैनदिन ऑक्सिजनची गरज व ती पुरवणार्यांच्या संपर्कात राहून रूग्णालयात पुरवठा होत असल्याची दक्षता घ्यावी.असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोलरूमला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी द्यावी.कंट्रोल रूम 31 डिसेंबर पर्यंत सुरू ठेवावी.ऑक्सिजन पुरवठ्याच्या अडचणी कंट्रोल रूमधून सोडवाव्यात.रूग्णालयानी देखिल दिलेल्या नियमांचे पालन करून ऑक्सिजन वाया जाणार नाही, रूग्णाला स्वत:ह ऑक्सिजन घ्यायला सांगू नये. तसेच आवश्यकतेपेक्षा अधिक ऑक्सिजन लावू नये. अश्या सुचना प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी दिल्या आहेत.








