जिल्हा रूग्णालयात न्यायाधिशांच्या उपस्थित
इनकॅमेरा शवविच्छेदन
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – आमचा रविंद्र उर्फ चिन्या हा न्यायालयीन बंदी होता.त्याची प्रकृती स्थिर असतांना आम्हाला न कळू देता त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश करीत रविंद्रचा मृत्यू झालाच कसा? जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल कराच? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही रविंद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रूग्णालयात काहि वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीसांनी जलद कृती पथक व दंगा पथक बोलाविल्याने वातावरण शांत झाले आहे.जेलवर गुन्हा दाखल करावे यासाठी पोलीसांना मयताची पत्नी मिनाबाई यांनी निवेदन दिले आहे.
न्यायाधिशांच्या उपस्थित जिल्हा रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयात रविंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटूंबीयांसह शिवाजीनगर भागातील रहिवाश्यांनी त्याठिकाणी एकच गर्दी केली होती. चिन्या याच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. त्यातच वडीलांचा मृत्यू हा मारहाणीतून झाला असून त्यांच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप मुलगा साई व त्याची आई मिनाबाई तसेच नातेवाइकांनी केला होता.तसेच इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात शनिवारी दि.12 रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास न्यायाधिशांच्या उपस्थित इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच मयताची पत्नी मिनाबाई रविंद्र जगताप उपस्थित होत्या.
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत व अंगावर काही जखमाही नातेवाईकांनी बघितल्यामुळे जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयताची पत्नी मिनाबाई रविंद्र जगताप व मुलगा साई याने केला आहे. जो पर्यंत खूनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही असी भुमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
काय आहे घटना
जळगावातील गेंदालाल मिल परिसरातील लकी जितेंद्र पवार हा त्याच्या मावस भाऊ आर्यशील उर्फ सोनू दिलीप अहिरे हे दोघ शिवाजीनगर हुडको भागात दि.6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी उभा असलेला चिन्या उर्फ रविंद्र जगताप याने या दोघांना तुम्ही याठिकाणी मुली बघण्यासाठी येता का? असे म्हणत चिन्यासह तीन ते चार जणांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली हेाती. नंतर त्या दोघांनी काही तरूणांना बोलवून आणले. मात्र पुन्हा वाद होवून त्यातील एकावर चॉपर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी चिन्यासह काही जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चिन्या याला अटक केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.