नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. मात्र इथून पुढे देखील लॉक डाऊन वाढणार का? याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली आहे.
आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली असून येत्या 15 मेला आता सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावली कालावधी संपत आहे. महाराष्ट्राच्या शिवाय देशात कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार यासह इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील साधारण मागील कालावधीमध्ये आकडेवारी भलेही कमी होत असले तरी आकडा मात्र 50 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ठाकरे सरकार इथून पुढे ही लॉक डाऊन यामध्ये वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील काल एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लॉकडाऊनमध्ये वाढ होणार का? याबद्दल आज मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यात हा निर्णय घेतला जाईल अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच सांगतील अशी माहिती दिली होती.
राज्यात मागील २४ तासांत रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ४० हजार ९५६ रुग्ण आणि ७९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली असून बळींचा आकडा ७७ हजार १९१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.