उद्या जादुटोणाविरोधी कायदा, चमत्कार सादरीकरण एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर
जळगाव (प्रतिनिधी) – येथील समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादुटोणाविरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर शनिवारी दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता दिवसभर आयोजित करण्यात आले आहे.
समाजातील शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्यासाठी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्र सरकारने जादुटोणा विरोधी कायदा व सामाजिक विरोधी कायदा हे दोन कायदे पारीत केलेत. बाबा बुवा हे चमत्कार करीत असतात.लोकांच्या अज्ञानाचा,अगतिकतेचा फायदा घेतात.देवधर्माच्या नावाखाली मानसिक बौद्धिक, शारीरिक शोषण होत असते.
जगात चमत्कार नसतात चमत्कारामागे हातचलाखी रासायनिक अभिक्रिया किंवा भौतिक क्रिया असते.आपण विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची सरणी घेतली नाही. त्यासाठी चमत्कार सादरीकरण कसे करावे हे समजून घेणे आवश्यक आहे.यासाठी समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विशेष शिबिर समाजकल्याण कार्यालय, महाबळ रोड, जळगाव येथे सहायक आयुक्त योगेश प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
शिबिर दि. १३ मे शनिवार रोजी सकाळी १० ते ४ या दरम्यान होणार आहे. शिबिरासाठी प्रशिक्षक अंनिसचे वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग राज्य कार्यवाह प्रा. दिगंबर कट्यारे व जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी हे आहेत. शिबिरार्थींची संख्या मर्यादित आहे. याची नोंद घ्यावी.शिबिरासाठी प्रवेश फी नाही.तरी ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी उपस्थिती द्यावी. असे आवाहन, जळगाव शाखा शहर कार्याध्यक्ष कल्पना चौधरी, शाखा प्रधान सचिव गुरुप्रसाद पाटील यांनी केले आहे.