नंदुरबार ( प्रतिनिधी ) – महावितरणने कृषी वीज धोरणात दिलेल्या सवलतीचा लाभ घेत तळोदा तालुक्यातील शेतकऱ्याने २० कृषिपंपांचे १५ लाख रुपये भरून वीजबिल कोरे केले आहे.
हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी हे वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. तळोद्यासह तालुक्यातील दलेलपूर व प्रतापपूर येथे ते स्वतःच्या शेतीसह इतर लोकांची भाड़ेतत्वावर शेती करतात. या शेतीच्या सिंचनासाठी एकूण २७ कृषिपंप वापरत आहेत. ते नेहमी महावितरणला सहकार्य करतात, मात्र काही कारणाने या पंपांचे वीजबिल थकित होते.
महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ३ ते ४ वेळा बैठक घेतली. त्यात हाजी निसारअली यांनी योजना समजून घेतली. शनिवारी तळोदा येथे लोकअदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला होता. यावेळी निसार अली मक्राणी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी चर्चा केली व दुपारी कार्यलयात येऊन २० वीजबिलांची थकबाक़ी १५ लाख २३ हजार ७० रुपये रोख व धनादेशाद्वारे भरली आणि थकबाकीमुक्त झाले.
महावितरणच्या वतीने उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी निसारअली यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सहायक अभियंता चेतन पाचपांडे, कनिष्ठ अभियंता विलास गुरव उपस्थित होते. उर्वरित ७ लाखांची थकबाकी २५ तारखेपर्यंत भरण्याचे तसेच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आश्वासन निसारअली यांनी दिले. या वसुलीसाठी अभियंत्यांसह तंत्रज्ञ बी एन. राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे यांनी प्रयत्न केले.