रावेर (प्रतिनिधी) – रावेर येथे पोलिसांनी घेतलेल्या झडतीत गावठी कट्टा आणि जीवंत काडतुस जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक तरूण हा नकली नोटा प्रकरणातील आरोपी आहे.
नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयितासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये रविंद्र राजाराम प्रजापति (वय ३१ राहणार कुंभार वाडा रावेर) याचाही समावेश आहे. या आरोपीच्या घरासह परिसराची झडती घेत असतांना पोलिसांना महेंद्र अर्जुन प्रजापती ( वय -२५) याच्याकडे गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांचे मॅगेझीन आढळून आले.
या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकातील कर्मचारी प्रमोद सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र अर्जुन प्रजापती ( वय – २५ ) आणि
रविंद्र राजाराम प्रजापती (वय ३२, दोन्ही रा. कुंभारवाडा रावेर) या दोघांच्या विरूध्द आर्म ऍक्ट ३/२५ भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख गफूर शेख कादर आणि शेख ईस्माईल शेख ईसा हे करत आहेत. यातील रवींद्र राजाराम प्रजापती याला नकली नोटांच्या प्रकरणात आधीच अटक करण्यात आलेली आहे.