नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जपानमध्ये यंदा होत असलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी आता केवळ पाचच महिने बाकी असले, तरी भारताच्या ऑलिंपिक पात्र खेळाडूंच्या करोना लसीकरणाबाबत अजून अनिश्चितता कायम आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या तरी ऑलिंपिक पात्र खेळाडूंना कधी लस देणार याबाबत काहीच सूचना नाहीत. आतापर्यंत तिरंदाज, मुष्टियोद्धे, पुरुष, महिला हॉकी संघ, धावपटू आणि कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेली ऑलिंपिक स्पर्धा यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. भारतीय खेळाडूंना लस कधी देण्यात येणार याबाबत मेहता यांनी केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्याशी पत्र संवाद केला आहे.
लसीकरणाची सर्व पद्धत आणि लशीचा साठा लक्षात घेऊन ऑलिंपिक पात्र खेळाडूंना लसीचे दोन डोस द्यावेत अशी मेहता यांनी आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे. सध्या आपले खेळाडू विविध केंद्रांवर सराव करत आहे. लशीकरणाचा कार्यक्रम निश्चित झाला की आम्ही तशा सूचना त्यांच्या क्रीडा संघटनांना देऊ. या संदर्भात लवकरात लवकर मार्गदर्शन करावे. ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे लशीकरण वेळेवर व्हावे हीच आमची इच्छा असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
ऑलिंपिकसाठी आता केवळ पाच महिने उरले आहेत. लशीचे दोन डोस आवश्यक असल्यामुळे ते वेळेत देण्यात यावे. आरोग्य मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली, तरी अजून काहीच सूचना नाहीत. यासाठी हा पत्र प्रपंच करावा लागला, असे मेहता म्हणाले.
गेल्याच आठवड्यात केंद्रिय क्रीडा मंत्र्यांनी ऑलिंपिक पात्र खेळाडूंना प्राधान्याने लस दिली जाईल, असे जाहिर केले होते. मात्र, अजूनही अनेक देश करोना संकटाचा सामना करत असल्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजनच अंधातरी असल्यामुळे चालढकल होत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.