जळगाव (प्रतिनिधी) – त्र्यंबक नगरातील बाहेती शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याला सुरक्षा कठडे नसून खाली जवळपास १५ फुटाची दरी आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. सुरक्षा भिंत अथवा कठडे तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.


‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १३ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, माजी स्थायी समिती सभापती अँड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, चेतन सनकत, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, चंदन महाजन, कुंदन काळे, महेश जोशी, राहुल वाघ आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
मेहरूण तलाव काठ परिसरात अनेक रहिवासी असून त्याठिकाणी गटारी नाही. तसेच इतर प्रभागातील पाणी त्याठिकाणी जमा होत असल्याने डास, मच्छरांचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांना याबाबत विचारणा केली असता तलाव परिसरात बांधकाम परवानगी देताना त्याठिकाणी नागरिकांनी स्वतः शोषखड्डा तयार करून त्यात सांडपाणी जिरवावे अशी अट घालून देण्यात आलेली असल्याची माहिती दिली. दरम्यान, उपमहापौरांनी तलाव परिसरात भूमिगत गटारी करता येतील का याची माहिती घेऊन नागरिकांची सोय करून द्यावी, असे सांगितले.
आदर्श नगरात समाजकल्याण कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या गल्लीतून पूर्वी महाबळमध्ये जाण्यासाठी रस्ता होता. परंतु आता त्याठिकाणी पक्की भिंत बांधण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी शेणखत, कचरा टाकण्यात येत असल्याने डास, मच्छरांचा त्रास होतो. परिसरातील नागरिकांनी याबाबत उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे तक्रार करीत निवेदन दिले. उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना सूचना देत भिंत हटविण्याबाबत माहिती घेऊन संबंधित विभागाकडे संपर्क करण्याच्या सूचना केल्या. तसेच शेणखत आणि इतर कचरा साफसफाईचे काम योग्य पध्दतीने करण्याचे सांगितले.







