जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर शहरात देवीच्या नावाने वर्गणी मागण्याच्या बहाणा करून महिलेच्या घरातून १ लाख २ हजाराची सोन्याचे दागिने जबरी चोरणाऱ्या संशयित आरोपीला शहरातील तांबापूरा परीसरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर शहरातील चैतन्य नगरात सुलोचना रमेशचंद जैन ह्या १२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता घरी एकट्या असतांना संशयित आरोपी सतबिर बलवितसिंग टाक (वय-२१) रा. तांबापूरा, जळगाव हा देवीच्या वर्गणी मागण्याच्या बहाणा करून महिलेच्या घरात प्रवेश करत महिलेजवळील १ लाख २ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील तांबापूरा येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सापळा सचून संशयित आरोपी सतबिर बलवितसिंग टाक (वय – २१) रा. तांबापूरा, जळगाव याला अटक केली. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.