दुचाकीवरून गोमांस वाहतूक; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

निंभोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गोमांस वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०६/२०२५ अन्वये कलम ५(क) व ९(अ) अंतर्गत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आंढळवाडी, ता. रावेर येथील सुनोदा रस्त्यावरील मराठी शाळेसमोर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (क्रमांक MH-19 DM-9623) थांबवून तपासणी केली असता, दुचाकीवरून गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात एकूण ३ किलो गोमांस (प्रति किलो २०० रुपये दराने अंदाजे ६०० रुपये किंमत), एक पांढऱ्या रंगाची पिशवी (१० रुपये) तसेच १० हजार रुपये किमतीची संबंधित मोटारसायकल असा एकूण १० हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपी म्हणून जलील शेख साबीर कुरेशी (वय ५३)फरहान शकील कुरेशी (वय १८ – विधिसंघर्षग्रस्त बालक)दोघेही रा. कुरेशी मोहल्ला, फैजपूर, ता. यावल, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी हे वरील नमूद दुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास निंभोरा पोलीस ठाण्याच्या मपोउनि. दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सध्या कोणताही आरोपी अटक करण्यात आलेला नाही.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर गोमांस वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.









