साकळीतील बालक अस्वस्थ; यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील साकळी गावात एका ११ वर्षीय बालकाला वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकांनी सोबत नेऊन दारू पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दारू पिल्याने बालक अस्वस्थ पडल्याचे पाहताच चालकांनी त्याला रस्त्यावर सोडून पलायन केले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत बालकाला घरी पोहोचवले. त्यानंतर अचानक बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

डॉ. आंबेडकर नगर, साकळी येथील दीपेश मुरलीधर भालेराव (वय ११) हा बुधवारी सकाळी घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी शिरसाड गावातील वाळू वाहतूक करणारे अज्ञात ट्रॅक्टर चालक त्याला सोबत घेऊन गेले. संशयितांनी त्या बालकाला दारू पाजली, ज्यामुळे तो काही वेळातच अस्वस्थ व अर्धबेशुद्ध झाला. स्थिती बिघडताच चालकांनी त्याला रस्त्याकडेला सोडून पळ काढला.
अस्वस्थ अवस्थेत बालक दिसताच नागरिकांनी त्याला घरी नेले. पण अचानक प्रकृती ढासळल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे आणि अधिपरिचारिका आरती कोल्हे यांच्या देखरेखीखाली बालकावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दीपेशच्या पालकांनी यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे. अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.साकळी परिसरात या प्रकारामुळे संतापाची लाट असून बालकाला त्रास देणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.









