# पहिल्या दिवशी मोफत भाजीपाला बियाणे
# मजूर समस्येला पर्यायावर भर, अपारंपरिक पिके, चार एकरवर प्रदर्शन… 250 हून अधिक स्टॉल्स…
जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्य करणाऱ्या अॅग्रोवर्ल्डतर्फे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शहरातील शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेजच्या मैदानावर या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला उद्यापासून (शुक्रवारी) सुरवात होत आहे. चार एकरवरील या कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.
कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे विपणन प्रमुख अभय जैन, साईराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, निर्मल सीडसचे संचालक डॉक्टर सुरेश पाटील, खान्देश एज्युकेशन सोसायटीचे नंदकुमार बेंडाळे, प्लॅन्टो कृषी तंत्रचे संचालक निखिल चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जळगावातील हे आठवे कृषी प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
प्रदर्शनास पहिल्याच दिवशी भेट देणाऱ्या शेतकर्यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे.
प्रदर्शनात काय पहाणार..??
मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ याच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.