जळगाव (प्रतिनिधी) – लोक कलावंत सध्या खूप अडचणीत असल्याने त्यांना शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी मदतीचा प्रयत्न आपण करणारच आहोत. पण, यासोबत लोक कलावंतांसाठी हक्काचे अमळनेर येथे भव्य लोक कलावंत तमाशा भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित खान्देश स्तरीय लोककलावंत परिषदेत बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने रविवारी अखील भारतीय लोक कलावंत तमाशा परिषद, अखील भारतीय शाहीर परिषद आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश लोक कलावंत विचार परिषद – २०२० चे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळात खान्देशी लोककला व लोक कलावंतांवर मोठा आघात झाला आहे. तमाशा, शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आधी लोककला प्रकारात काम करणार्या व लोक कलेचे जतन व संवर्धन करणार्या लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.







