पुणे (वृत्तसंस्था) – बहिणीसह 11 महिन्यांच्या भाच्याला भोरला सोडण्यासाठी जात असताना रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात चिमुरड्याचा मृत्यू झाला. जुना कात्रज घाटाच्या आधी हा अपघात घडला. रिक्षा चालविताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रिक्षाचालक मामाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
कार्तिक अविनाश पारवे (वय 11 महिने ) असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. विकास विजय जाधव (वय 25, रा. हडपसर) असे अटक केलेल्या रिक्षाचलाकाचे नाव आहे. याप्रकरणी रणजित जालिंदर काटे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास विकास रिक्षातून बहिणीसह भाच्याला भोरला सोडण्यासाठी जात होता. त्यावेळी जुन्या कात्रज घाटाच्या आधी अचानक एसटी समोर आली. त्यामुळे विकासचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्याने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा उलटल्याने 11 महिन्यांचा कार्तिक गंभीररित्या जखमी झाला.
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहन चालविताना हलगर्जीपणा केल्यायाप्रकरणी विकासला पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख तपास करीत आहेत.