मुंबई (वृत्तसंस्था) – विवाह जुळवणाऱ्या जीवनसाथी वेबसाईटवरुन ओळख करुन एकाने उच्चशिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 9 लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटुकले (रा. सातारा ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी उच्चशिक्षित असून एका कंपनीत कामाला आहे. लग्नासाठी तरूणीने जीवनसाथी वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्यानुसार समीर जोशी नावाने जगन्नाथ याने तरूणीशी ओळख वाढविली. तरुणीशी फोनवरून संपर्क साधून त्याने तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर जगन्नाथने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाईनरित्या पैसे घेतले. त्याने आतापर्यंत 9 लाख रुपये उकळले आहेत. त्यानंतर त्याने तरुणीचा व्हॉट्सअॅप क्रमांक ब्लॉक करुन तिच्याशी संपर्क साधणे बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास राऊत तपास करीत आहेत.