नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – शिवसेनेतून बंड केलेल्या १६ आमदारांवर . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना दिलासाच मिळाला आहे.
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर पूर्ण सुनावणी होईपर्यंत कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. या सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापना आवश्यक आहे; त्यामुळे उद्या सुनावणी होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकूण सात प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापना करणे गरजेचे आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये, असे आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले .
शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर आज ठरलेल्या तारखेला म्हणजेच ११ जुलै रोजी सुनावणीसाठी घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र ही मागणीदेखील सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. पुढील सुनावणी नेमकी कधी होणार याबाबत न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेले नाही.