जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने अलीकडेच आयुर्वेदीक पदवीधरांना ५८ प्रकारच्या सर्जरी करण्याचा दिलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा असून इंडियन मेडिकल असोसिएशनने याचे खुल्या दिलाने स्वागत करावे असे आवाहन निमा या संघटनेचे पदाधिकारी तथा आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सतीश शिंदाडकर यांनी केले आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच आयुर्वेदीक पदवीधरांना ५८ प्रकारच्या सर्जरी करण्याचा दिलेला निर्णय जाहीर केला आहे. याच मुद्यावरून आयएमएने आज देशव्यापी बंद पुकारला असून याबाबत आम्ही आधीच आयएमएची भूमिका आपल्या समोर मांडली आहे. आज आयुर्वेदीक तज्ज्ञांनी भूमिका आपल्यासाठी सादर करत आहोत. या अनुषंगाने आम्ही निमा या संघटनेचे पदाधिकारी तथा ख्यातनाम आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सतीश शिंदाडकर यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, आयुर्वेदीक पदवीधरांना आधीपासूनच आयुर्वेदासह अॅलोपॅथीचे शिक्षण दिले जात आहे. तसा सिलॅबस आधीपासूनच शिकवण्यात येत आहे. यामुळे आम्ही बॅक-डोअर या प्रकारात एंट्री करत असल्याचा आरोप खोटा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. शिंदाडकर पुढे म्हणाले की, आयुषमधून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आधीच शस्त्रक्रियेत पारंगत करण्यात येत असून आता शासनाने अतिशय स्पष्टपणे शस्त्रक्रियेची परवानगी दिल्याची बाब अतिशय स्वागतार्ह अशी आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने याचे खुल्या दिलाने स्वागत करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर सरकारच्या या निर्णयामुळे अगदी खेडोपाड्यातील लोकांना अत्याधुनीक वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा आशावाद सुध्दा डॉ. सतीश शिंदांडकर यांनी व्यक्त केला.