मुंबई (वृत्तसंस्था)- शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.
अशातच बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाईनंतर कंगनाने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. याबाबत तिने एक व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये ती मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करत असल्याचं दिसतंय याचबाबत तिने आज ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये पुन्हा कंगनाने मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
तिने ट्विट केले आहे की, श्री बाळासाहेब ठाकरे ज्या विचारधारेवर यांनी शिवसेनेचा पाया रचला, तिच विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी सोनिया सेना बनली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका,’ असं कंगनानं म्हटलं आहे.
ती पुढे म्हणाली , वडिलांच्या चांगल्या कर्मामुळं तुम्हाला धनदौलत तर मिळू शकते मात्र आदर तुम्हाला स्वत: कमवावा लागतो. माझं तोंड बंद कराल मात्र माझ्यानंतर शंभर जण तो आवाज लाखों लोकांपर्यंत पोहोचवतील. किती तोंडं तुम्ही बंद करणार? कुठवर सत्यापासून दूर पळणार. तुम्ही फक्त वंशवादाचं एक उदाहरण आहात, बाकी काही नाही, असं कंगनानं एकेरी भाषा वापरत ट्वीटमध्ये म्हटलंय.