जळगाव (प्रतिनिधी) – महिला बचत गट व वाहनधारकांनी विविध फायनान्स कंपन्यांमार्फत कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले व वाहनधारकांनी वाहन खरेदी केले. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार व व्यापार ठप्प झाल्यामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असताना, फायनान्स कंपनी वाल्यांनी मात्र वाहनधारकांकडून व या कर्ज धारकांकडून हप्त्यांची सक्तीची वसुली सुरू केलेली आहे.
महिला बचत गटांच्या कर्ज धारकांकडून घरात घुसून महिलांशी अरेरावी करून फायनान्स कंपनीचे कर्मचारी सक्तीची वसुली करीत आहे व वाहनधारकांचे जोर जबरदस्ती वाहन ताब्यात घेऊन सक्तीच्या हप्ता वसुली सुरू ठेवलेली आहे. फायनान्स कंपनीच्या या सक्तीच्या वागणुकीमुळे महिला व वाहनधारकांना अतिशय मानसिक त्रास निर्माण होत आहे.
या अनुषंगाने फायनान्स कंपनी वाल्यांनी तात्काळ सक्तीची वसुली बंद करावी या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
केंद्राने हप्त्यांसाठी दिली मुदत, परंतु फायनान्स कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. सक्तीची हप्ते वसुली लाॅक डाऊनमुळे सर्व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे केंद्र सरकारच्यावतीने व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्यावतीने सर्व कर्ज देणाऱ्या बँका व फायनान्स कंपन्यांना आदेश दिले की नागरिकांना कर्जाच्या हप्त्यांसाठी म्हणजेच मेरोटोरीअमची मुदत ही वाढवण्यात आलेली असताना देखील खाजगी फायनान्स कंपन्यांनी मात्र केंद्र सरकारच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिकांकडून व कर्ज धारकांकडून सक्तीची हप्ते वसुली सुरू केली आहे.
फायनान्स कंपन्यांची बैठक सोमवारी घेणार – जिल्हाधिकारी
जळगाव जिल्हा एनएसयुआयना केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की सोमवारी खाजगी फायनान्स कंपनीच्या सर्व वसुली अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून सक्तीची वसुली करू नये याबाबत सूचना देण्यात येतील. या प्रकारचे आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, जावेद मिस्त्री, भरत ललवानी, शब्बीर शेख, नावेद भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.