चोपडा ( प्रतिनिधी ) – पंचक येथे मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून सोन्याचे दागिने, रोकड आणि दोन मोबाईलसह इतर मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरी करतांना घरात झोपलेल्या तरूणीला जाग आल्यानंतर चोरटे पसार झाले.
पंचक येथे आकाश मनोहर पाटील हे आई लताबाई आणि बहीण आरती यांच्यासह वास्तव्याला आहे. दरम्यान आकाश मावशीकडे बाहेरगावी गेला होता. त्यामुळे त्यांची आई लताबाई पाटील आणि बहिण आरती पाटील घरात होत्या. ९ मेरोजी आई व मुलगी यांनी जेवण करून घराला आतून कडी लावून झोपलेल्या होत्या. १० मेरोजी ४.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात ठेवलेले दागिने, ९४ हजाराची रोकड, देव्हाऱ्यात ठेवलेले चांदीचे देव आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला.
आरतीने तिचा मोबाईल झोपतांना उशीजवळ ठेवला होता. चोरी केल्या नंतर चोरटा आरतीचा मोबाईल लांबविण्याचा प्रयत्नात असताना मोबाइलला चार्जरची वायर लावलेली होती. मोबाइल ओढताच चार्जच्या वायरमुळे आरतीला जाग आली. सुरुवातीला तिला वाटले की, भाऊ आकाश आला असे आई लता यांना सांगितले. परंतु आकाश गावाला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नेमका हा कोण असे आईला सांगितल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली हे पाहून चोरटा पसार झाला.
यावेळी गल्लीतील ग्रामस्थ यांनी धाव घेऊन घाबरलेल्या लताबाई यांना धीर दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह सुनिल तायडे, जयदिप राजपुत, पंचक गावाचे पोलिस पाटील सतीश वाघ असे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वानपथक बोलून चौकशीला सुरुवात केली आहे. घरापासून जवळ असलेल्या शेतात देव्हाऱ्यातील लाल कपडा आढळून आला. पुढील तपास आडावद पोलीस करीत आहेत.