जळगाव (प्रतिनिधी) – कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारी आस्थापनेत एसी बसविण्याचा अधिकार नाही, त्यामुळे एसी तत्काळ काढावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील एसी काढण्यात आलेत. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता हे पद विभागीय दर्जाचे आहे. अधिष्ठाता तसेच, प्रोफेसर यांना शासन निर्णयनुसार नुसार “एसी” लावण्याचा अधिकार असल्याबाबत अधिकाऱ्यांनी गुप्ता यांना माहिती दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्रोफेसरांचे एसी कायम आहेत.
जिल्ह्यात सर्व सरकारी आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांपासून लिपिकांपर्यत अनेकांनी एअर कंडिशनर (एसी) बसविले आहेत. वास्तविक, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला एसी बसविण्याचा अधिकार नाही. हे एसी शासनाने तत्काळ काढून घ्यावेत, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, निवासी अधिकारी डॉ. सुशांत सुपे, डॉ. मिलिंद बारी यांच्या दालनातील एकूण ४ एसी काढून टाकण्यात आले आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी आस्थापनांमधील एसी अद्याप आहेत.
तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अधिष्ठाता, प्रोफेसर यांना वातानुकूलित यंत्र बसविण्याचा अधिकार असल्याबाबतची माहिती दिपककुमार गुप्ता यांना देण्यात आली आहे. महाविद्यालयात एकूण ९ प्रोफेसर आहेत. यातील अधिष्ठातांसह काही प्रोफेसरांकडे आजही वातानुकूलित यंत्रे बसविली आहेत. अधिष्ठाता हे पद विभागीय दर्जाचे आहे. राज्य शासनाच्या मे २०२२ च्या परिपत्रकानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि प्रोफेसरांना एसी बसविण्याचे अधिकार प्राप्त होत असल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.