मुंबई (प्रतिनिधी) – विधानपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आवाज अधिक बुलंद करण्यसाठी पक्षाने आता राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना गटनेतेपदी संधी दिली आहे. त्यामुळे बहुचर्चित गटनेता निवडीची चर्चा आता थांबली असून सत्ताधारी शिंदे गट – भाजपाला घेरण्यासाठी आ. खडसे यांची आक्रमक भूमिका कशी राहील याकडे आता जनतेचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथराव खडसे तर प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र पक्षातर्फे विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोर्हे यांना देण्यात आले आहे. सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून विरोधी पक्षाची धार वाढवली आहे. आता आ. खडसे गटनेता झाल्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम ते करतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच गटनेते झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी वाढ होण्यासाठी मदत मिळेल, असे चित्र आहे.