जळगाव ( प्रतिनिधी ) – कालच्या रात्रभरात घरांची कुलुपे तोडून ६ घरफोड्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर तालुक्यातील शिरसोली गाव हादरले आहे . दीड लाख रुपये रोख आणि दीड लाखाचे सोने व अन्य ऐवज या चोरांनी चोरून नेला .
काही लोक घराला कुलूप लावून बाहेर गेलेले आणि काही लोक घराच्या छतावर झोपलेले असल्याचे हेरून चोरांनी हा डाव साधला असावा असे सांगण्यात आले . या घरफोड्यांमध्ये सुधिर भावराव पाटील , पुनमचंद विठ्ठल देवरे यांच्या घरातून रोख 500 व चादीचे देव , राजेंद्र बारी यांच्या घरातून १५ हजार रुपये रोख , महेंद्र चव्हाण यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख , योगेश देशमुख यांच्या घरातून १० ग्राम वजनाचे दागिने आणि २० हजार रुपये रोख , सपना गोंधळी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख , ३ ग्राम वजनाचे दागिने आणि मोबाईल लंपास झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घरफोड्या झालेल्या घरांची पाहणी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्र्कांत गवळी , सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा , पो नि विजय शिंदे यांच्यासह एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली .बोटांचे ठसे घेणारे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते या श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढल्यावर ते माघारी फिरल्याने फार काही निष्पन्न होऊ शकले नाही असे ग्रामस्थांनी सांगितले . यावेळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.काँ. ढवळे, संदिप धनगर, मुकेश पाटील, कीशोर पाटील, रवींद्र चौधरी, विजय काळे , शिरसोलीचे पोलीस पाटील शरद पाटील, श्रीकृष्ण बारी हे ठाण मांडून होते .