नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. रशियाने यापुढे भारताला स्वस्त दरात क्रूड ऑईल देण्यास नकार दिला आहे.
बीपीसीएल आणि एपपीसीएल या दोन्ही कंपन्यांची रशियन कंपनी रोसनेफ्टशी सुरु असलेली बातचित असफल ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चांगल्याच वाढल्या आहेत. रुपयाही डॉलरच्य तुलनेत घसरला आहे.याचा एकत्रित परिणाम येत्या काळात देशात पेट्रोल-डिझेलच्या भडक्याच्या स्वरुपात होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या भाववाढीचा परिणाम थेट देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होतो. गुरुवारी ब्रेंट क्रूड 124 डॉलर्स प्रति बॅरल इतक्या मोठ्या किमतीने विकले गेले. तोटा कमी करण्यासाठी देशात इंधानांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात य़ेते आहे.
आत्ता सध्या केवळ इंडियन ऑईल याच कंपनीचा, रशियन कंपनीसोबत सहा महिन्यांचा स्वस्तात कच्चे तेल मिळण्याबाबतचा करार आहे. इंडियन ऑईल कंपनी रशियातील कंपनीकडून दर महिन्याला 60 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करु शकणार आहे. 30 लाख बॅरल जास्त खरेदी करण्याचाही पर्याय आहे. भारतातील रिफायनरींना आता कच्च्य़ा तेलासाठी स्पॉट मार्केटमध्ये जावे लागेल, जिथे कच्चे तेल महाग मिळण्याची शक्यता आहे
गुरुवारी रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात अजून घसरण झाली आहे. सातत्याने रुपयाच्या होत असलेल्या घसरणीमुळे कच्च्या तेलाची आयातही देशाला महाग पडणार आहे.