मुंबई (वृत्तसंस्था) – भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, या घटनेसाठी तेथे ड्युटीवर असणाऱ्या दोन नर्सचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मध्यरात्री अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये एक लहानसा स्पार्क झाला. त्यानंतर तो वाढत गेला आणि आग लागली. यावेळेस ज्याठिकाणी मुले ठेवली होती. तिथे दोन नर्सेसची ड्युटी होती. मात्र, या ठिकाणी त्या उपस्थित नव्हत्या. त्या दोघी त्यावेळेस काय करत होत्या, त्यांच्या फोनच्या डिटेल्सवरुन शोधण्यात येत आहे. त्याचा डेटा भंडाऱ्याचे एसपी देत आहेत. नर्सेसचा निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे प्राथमिक स्वरुपात दिसते, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच, त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. सीसीटीव्ही आणि पोलिसांची लेखी रिपोर्ट आल्यानंतर एफआयआर दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होईल. कोणालाही पाठी घालण्याचा सरकार प्रयत्न करत नाहीये, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेबाबत या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात सुरु असून मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले होते.