नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्वत:ला अजातशत्रु व्यक्ती मानणारे आणि सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले सातारचे राज्यसभा सदस्य, भाजपा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयन राजे भोसले यांच्या एका कृतीने महाराष्ट्रात राजकीय चर्चेनं डोकं वर काढलं आहे. कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरच कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्याने महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने वळण घेणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट ऍण्ड वॉच…’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं या प्रकरणातले गूढ वाढले आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नाना पटोले कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मागील आठवड्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नियुक्ती झाल्यापासून नाना पटोले यांनी भाजपाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडण्यास सुरूवात केली असून, कॉंग्रेसला बळकटी देण्यावर अधिक भर राहणार असल्याचं त्यांनी नियुक्तीनंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळेही या भेटीची चर्चा रंगली आहे.
आता या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं आहे. तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. कॉंग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे.