मुंबई (वृत्तसंस्था) – आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे.
दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. पंतप्रधांना लस देणाऱ्या या महिलेचं नाव ‘पी. निवेदा असं आहे. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत. मात्र, मोदींना लस देण्याऱ्या निवेदा यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
निवेदा म्हणतात, ‘मी मागील तीन वर्षांपासून एम्समध्ये काम करत आहे. सध्या मी करोना लसीकरण केंद्रात कार्यरत आहेत. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणासाठी येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. पीएम सरांना लस देण्यासाठी मला बोलवण्यात आलं तेव्हा ते लस घेण्यासाठी पोहचल्याचं समजलं’
पुढे निवेदा म्हणाल्या ‘मला सरांना भेटून खूप छान वाटलं. त्यांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. त्यांना भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस देण्यात आली असून पुढील डोस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे.’ असं देखील निवेदा यांनी सांगितलं आहे.