पालेकेले (वृत्तसंस्था) – वेस्ट इंडिजचा कर्णधार कॅरन पोलार्ड याने गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात सहभाग घेतला तेव्हा 500 टी-20 सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळविला. 500 टी-20 सामने खेळताना पोलार्डने 10 हजार धावांचा पल्लाही पार केला. फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखविताना त्याने 279 बळीदेखील घेतले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची आक्रमक फलंदाजी त्याच्या वेस्ट इंडिज संघालाच नव्हे तर विविध देशांत होत असलेल्या टी-20 लीग स्पर्धेतही लाभदायक ठरत आहे.
पोलार्डने टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 652 षटकार व 647 चौकारांची आतषबाजी केली आहे. वेस्ट इंडिज संघासह पोलार्ड इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मुंबईने या स्पर्धेचे सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळविले आहे.