मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात एका क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 183 झाली आहे. आज (28 मार्च) जळगावमध्ये एक रुग्ण आढळला आहे. जळगावातील मेहरुन भागातील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर पुण्यात आणखी तीन रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 24 वर पोहोचली आहे.
तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे. मुंबईत आज दिवसभरात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 5 जणांचा रिपोर्ट सकाळी पॉझिटिव्ह आला होता. तर 7 जणांचा नुकतंच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह (Total Corona patient in Maharashtra) रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कल्याण-डोंबिवली परिसरात 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 183 वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.