वशिलेबाजी , मर्जीतल्या व्यक्तीनांच मिळतेय संधी
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अ श्रेणीची अनेक पदे अनेक वर्षांपासून रिक्त असून या पदांवर अकार्यक्षम व्यक्तींची नेमणूक झाल्याने त्या त्या विभागाच्या पदाला योग्य न्याय मिळत नसल्याची खंत अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे रिक्त पदांवर पात्रता असलेल्या व्यक्तीची नेमणूक न करता केवळ आपल्या मर्जीतील अथवा वशिलेबाजी करून या पदावर प्रभारी राज्य गाजविणाऱ्या व्यक्तींची निवड झाल्याने या रिक्त पदांवरील प्रभारी नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागातील महत्वपूर्ण पदांमध्ये सहाय्य्क कुष्ठरोग अधिकारी,जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी,जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी , सहाय्य्क जिल्हा आरोग्य अधिकारी आदी महत्वाची पदे रिक्त असल्याने या ठिकाणी एमबीबीएस पदाची अहर्ता असतानाही बीएचएमएस झालेल्या व्यक्तींना प्रभारी कारभार सोपविण्यात आल्याने आरोग्य विभागात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व पदांवर प्रभारीची नेणूक करताना शासनाचे नियम डावलून नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी वशिलेबाजी, आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र ज्यांना पात्रता असतानाही डावलले जात आहे अशा व्यक्तींमध्ये आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला जात आहे. पात्रता असलेल्या व्यक्तीचीच नियुक्ती केली जावी अशी मागणी होत असून याची चौकशी करून कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.