जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळण्यासाठी अधिकाऱ्यांचे लक्ष
जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अमृत आहार योजनेच्या अमलबजावणीवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या माध्यमातून थेट नियंत्रण ठेवण्यात येत असून अमृत आहारच्या प्रभावी अमलबजावणीसाठी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून दररोज देण्यात येणाऱ्या आहाराची सचित्र माहिती घेतली जात आहे. त्यासोबतच दररोज दिल्या जाणाऱ्या आहाराचे जिओ टँगिंग असलेले छायाचित्र देखील घेतले जात आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत आदिवासी क्षेत्रात एकूण ४ प्रकल्प कार्यरत आहेत. चोपडा येथील २ प्रकल्पात एकूण ४२ अंगणवाडी केंद्र आहेत. रावेरच्या एका प्रकल्पात एकूण ५ अंगणवाडी केंद्र, रावेर २ प्रकल्पात एकूण ४४ अंगणवाडी केंद्र आणि यावल प्रकल्पात एकूण २५ अंगणवाडी केंद्र आदिवासी भागात कार्यरत असून सदर प्रकल्पांमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही राबवली जात आहे.
सदर योजनेमध्ये टप्पा एक व टप्पा दोन अशाप्रकारे राबवली जात असून टप्पा एक मध्ये गरोदर व स्तनदा मातांना एक वेळेचा आहार अंगणवाडी केंद्र मध्ये दिला जातो तर टप्पा २ मध्ये ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना महिन्यातून १६ दिवस अंगणवाडी केंद्रात अंडी किंवा केळी यांचा पुरवठा केला जात असतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अमृत आहाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व नियंत्रणासाठी पुढाकार घेतला असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दररोज आहार देण्याच्या अनुषंगाने आढावा घेतला जात असून पाठपुरावा केला जात आहे.
व्हाट्सअपच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये गरोदर व स्तनदा मातांचे प्रत्यक्ष जेवण करत असताना चे जिओ टॅग फोटो व सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे अंडी किंवा केळी खातानाचे फोटो हे नियमितपणे ग्रुपवर मागवले जातात सदर फोटो चेक केले जात असून त्या अनुषंगाने वेळोवेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य त्या सूचना दिल्या जातात.
सदर उपक्रम राबविण्यात जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना, पर्यवेक्षिका यांना व अंगणवाडी सेविका यांना सूचना देण्यात येतात. वेळोवेळी आढावा घेतला जातो.