दवाखान्यातच केला समझोता, मात्र निलंबनाची जोरदार चर्चा…
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगावला बदली झालेल्या अधिकाऱ्याला जळगाव येण्याबाबत मुंबईवरून आदेश असतानाही त्याला येता आले नाही. याला आरोग्य विभागातील अधिकारीच जबाबदार असल्याची खुन्नस त्याला होती. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी या अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी घरी निघाला असता फिल्मी स्टाईल त्याची कार अडवत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये जबर हाणामारी झाली. डोके फुटली. प्रकरण पोलीस स्टेशन आणि रुग्णालयापर्यंत गेले. दरम्यान दोघांनी समझोता केल्याने वादावर पडदा पडल्याचे सांगितले. मात्र याबाबत जिल्हा परिषदेमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
चाळीसगाव येथे सिकलसेल समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्याला जळगाव येथील जिल्हा परिषदेत यायचे आहे. त्याबाबत मुंबई येथील आरोग्य आयुक्तांनी तत्कालीन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पत्र दिले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्याची चाळीसगावला बदली का झाली याबाबतचे स्पष्टीकरण डॉ. आशिया यांनी मुंबई आयुक्तांना पाठविले होते. त्यानुसार या सिकलसेल समन्वयकाची चाळीसगाववरून जळगावला बदली झाली नाही.
दरम्यान, माझी बदली न होण्यामागे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जबाबदार आहे अशी त्याला माहिती मिळाली. त्यावरून त्याने खुन्नस ठेवली. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेनंतर ड्युटी संपल्यावर कार्यक्रम व्यवस्थापक हे दूध फेडरेशन जवळील घरी जायला निघाले. त्यावेळी शिवाजीनगर पुलापासून ते सुरेशदादा जैन यांच्या घरापर्यंत सिकलसेल समन्वयकाने दुचाकी तीन ते चार वेळा फिल्मी स्टाईल कारला टच करण्याचा प्रयत्न केला.
मात्र सुरेशदादांच्या घराजवळ त्याने कारला दुचाकी आडवी लावण्यात यशस्वी झाला. त्यावेळी कार्यक्रम व्यवस्थापक व सिकलसेल समन्वयक या दोघांमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर सिकलसेल समन्वयकाने कार्यक्रम व्यवस्थापकाच्या दोन वेळा कानशिलात लगावली आणि थेट मुद्द्यावरून गोष्ट गुद्द्यावरून आली. प्रत्युत्तरात कार्यक्रम व्यवस्थापकानेही त्याला मारहाण केली. यात दोघांना डोक्याला दुखापत झाली.
प्रसंगी तेथे एक पोलीस कर्मचारी आला. त्याने पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथून मेमो घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन त्यांनी रात्री उपचार घेतले. तेथेच त्यांनी आपल्याला प्रकरण वाढवायचे नाही, म्हणून तडजोड केली. मात्र याबाबत शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नवीन सीईओ श्री अंकित या प्रकरणामध्ये काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागून आहेत.
दरम्यान सिकलसेल समन्वयकाचे चाळीसगाव तालुका आरोग्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगले फैलावर घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. जर तुझी ड्युटी चाळीसगावला होती तर तुझ्या जळगावला कशासाठी गेला ? अशा स्वरूपात प्रश्न केला. मात्र त्याच्याकडे स्पष्ट उत्तर नव्हते. प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह सर्वत्र चर्चा होती. दरम्यान, दोघांपैकी एकाच्या निलंबनाबाबत जोरदार चर्चा सुरू असून अधिकृत माहिती मिळाली नाही.